Sunday, June 25, 2017

पर्वती, नृपचा पहिला ट्रेक

नृप, माझ्या भावाचा ६ वर्षाचा मुलगा! 

मी ट्रेकला जायची तर माझ्या मागे लागायचा... म्हणायचा, “आत्या, तुम्ही ट्रॅकिंगला जाऊ नका.. नाहीतर मी येतो तुमच्याबरोबर” एस.जी. बरोबरचा उल्हास व्हॅली ट्रेक त्याच्यामुळे मला कॅन्सल करावा लागला होता.

एकदा त्याला पर्वतीला घेऊन जायचं ठरवलं.. ओंकार, माझ्या दुसऱ्या भावाच्या मुलाला सोबत घेतलं. नृपला इतका कमालीचा आनंद झाला की स्वत:ची सॅक काढली आणि स्वत: भरायला सुरुवात केली. वॉटर बॉटल, खाऊचा डबा, कॅप, फ्लाईग डिस्क, बॉल, नॅपकीन हे सर्व सॅक मध्ये भरलं. सॅक मध्ये काय घेऊ काय नको असं त्याला झालं होतं. “आत्या ऊनो घ्यायचं? आत्या बॅट-बॉल घेऊ?” प्रश्नावर प्रश्न सुरु होते?..मला गंमत वाटत होती...ट्रेकची त्याची कल्पना किती गमतीशीर होती... “खेळायचं”.....बस्स इथचं ती सुरु होत होती आणि इथचं ती संपत होती.!  

त्याच्या निरीक्षण शक्तीचं मला कौतुक वाटतं होत. ट्रेकला सॅक घ्यावी लागते, खाऊ, पाण्याची बाटली, कॅप लागते हे त्याला माहित होतं! अजून दोन गोष्टी होत्या....त्याला माझ्यासारखी ट्रेकिंग स्टिक पण हवी होती आणि टॉर्च पण हवी होती. टॉर्च हवी म्हणून तर रडला देखील होता. “अंधार असेल तर?” ..त्यावेळी त्याला उजेड आणि अंधाराची संकल्पना समजत नव्हती आणि टॉर्चचं आकर्षण! किती सांगीतलं की दिवसा टॉर्च लागत नाही तरी त्याला ते उमगायचं नाही. त्याच्या समाधानासाठी शेवटी टॉर्च सोबत घेतली!

ट्रेकच्या दिवशी सकाळी स्वत:हून उठला. स्वत:चं आवरलं...उत्साह ओसंडून वाहत होता..ओंकारला त्यानेच उठवलं! रिक्षेने पर्वतीला गेलो. पाय-या चढायला सुरुवात करणार तोच हा थांबला...सॅक मधून कॅप काढली आणि डोक्यावर तिरपी घातली...एकदम स्टाईल मारतं!  मी आणि ओंकार बघतचं राहिलो आणि दोघांच्याही चेह-यावर हसू फुटलं!









६-७ पाय-या चढल्या नसतील तर दमून धपकन पाय-यांवर ठाण मांडलं!  मला आणि ओंकारला वाटलं झालं इथूनच माघारी जाव लागणार बहुतेक....पण थोडं थांबून परत चढायला सुरुवात केली....आता तर हा मुलगा पळायलाचं लागला....मला आणि ओंकारला भीती ह्याची की पडला, लागलं, खरचटलं तर काय.....त्याला आवरता ओंकारला नाकी नऊ आले!

काही पायऱ्या चढून जात नाही तर पाणी हवं........परत काही पायऱ्या चढल्या तर “आत्या भूक लागली”....

येणारे-जाणारे त्याच्याकडे कौतुकाने, कुतुहलाने बघत होते. स्वारी एकदम ट्रेकच्या पेहरावात होती ना! लोकांच्या चेह-यावर दमणूक दिसत नव्हती तर स्मितहास्य दिसत होतं!
काही पाय-या चढल्या की थांब....असं थांबत थांबत पर्वती चढलो...मला कौतुक वाटलं की "आत्या घरी जाऊ" असं म्हणाला नाही. खरं तर मी त्याचीही तयारी ठेवली होती!
आता तो चांगलाच दमला... 
खरं तर दमला नाही ....बोअर झाला ....भला मोठा आळसं दिला...जांभई दिली....
सगळ पाहून झाल्यावर मग फ्लाईग डिस्क खेळलो...मग काय ..तिथून निघायलाचं तयार नाही!
पर्वती चढायला आलेल्या बाबांसोबतची लहान मुले त्याच्याकडे आशेने, कुतुहलाने बघत होती...कारण आमची ट्रेकची तयारी जाम भन्नाट होती ना!

उतरताना काय मग..ओंकार आणि तो धावतच सुटले...स्वारी एकदम खूष!


पर्वतीवरून आलो...घरी न जाता सरळ बागेत...खेळायला.....लहान मुलांसाठी आपला स्टॅमीना किती हवा बघा हं! त्यांच्या गोष्टी पण अशा त्यांच्या साठी ईटरेस्टिंग बनवाव्या लागतात....त्यांच कुतूहल जागं होईल असं काही कराव लागतं! त्यांच मन कशात रमतं ते शोधाव लागतं....

पर्वतीला काही जणां सोबत लहान मुले देखील होती. ते पाहून छान वाटतं होतं. मुलांच्या होमवर्क, शाळा यासाठी आपण जसं मागे लागतो, आपण स्वत: बसून तो करून घेतो त्याप्रमाणेच अशा आउटडोअर अॅकटीव्हीटीज साठी देखील आपण वेळ काढायला हवा! 

माझ्या एक लक्षात आलयं, मुलांसारखा दुसरा परीक्षक आणि समीक्षक कोणी नाही...........

मी ट्रेकिंगला सुरुवात केली तेव्हा रेडिओवर फार जुनं एक गाणं लागलं होतं...१९५८ सालातलं, सुप्रसिद्ध गयिका आशा भोसले यांनी गायलेलं आणि शकील बदायुनी यांचे बोल असणारं हे गाणं "पढोगे लिखोगे बनोगे नवाब, तुम बनोगे नवाब.......जो खेलोगे कुदोगे होंगे खराब, तुम होंगे खराब" ....तेव्हाचा काळ असाच होता...तो काळ गाण्यातून बाहेर आला होता........मी लहान असताना थोडीफार काहीशी अशीच संस्कृती होती..विचारधारा, दृष्टीकोन असाच काहीसा होता..मुलींनी खेळणे म्हणजे तर.......पण आज......माझ स्वत:चचं उदाहरण आणि प्रवास झालेला बदल अनुभवण्यासाठी पुरेसा आहे! 

नृपची ट्रेकची इच्छा पूर्ण झाली! ट्रेक त्याला आजही आवडतो. माझ्या मागे लागतो. विशाल आणि शिव ने तर त्याला एकदा ट्रेकला आणायला देखील सांगितले.

एक जाणवलं ते हे की त्याच्या वयाची मुलं खेळतात खूप....खासकरून बागेत...आपल्याला वाटतं त्याच्या वाढीसाठी आणि विकासासाठी ते बास आहे...एरवी कुठे जायचं असेल तर बाबांची चार चाकी गाडी तयार असतेच...शाळेची गाडी, रिक्षा देखील घराच्या दारात येते....मुलांना चालण्याची सवयचं नसते...त्यामुळे पायात जी ताकद यायला हवी ती येत नाही.....मुलांच्या पायात ती ताकद यायला हवी असेल तर आपणं मुलांसोबत चालायला हवे.......खेळायला हवे...... मुलांच्या ह्या गोष्टींसाठी वेळ काढायलाचं हवा...

आपण मुलांसोबत “मुलं” होऊयात....म्हणजे त्यांच्या बरोबर लाडे-लाडे बोलणं, हसण, रुसण, हातवारे करण, अॅक्शन करणं नव्हे....हा सुरुवात ह्याने होऊ शकते....तर मुलांसोबत चालताना, खेळताना तो आपला मुलगा/मुलगी, भाचा/ भाची ई. कोणी आहे हे विसरुयात...हे नातं विसरूयात .....ही भावना विसरुयात....हा अधिकार विसरुयात .....फक्त आणि फक्त एक लहान मुलं व्हाव होऊयात....बघणाऱ्याला असं वाटायला हवं की खरोखरचं दोन लहान मुलंचं आहेत....करून बघा ...मी बघतेय......